दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या कायद्यामध्ये ज्या निवडणुका घेतल्या जातात, त्यामध्ये मतदान सक्ती करता येईल का, याबाबत विचार करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. 


‘लोक बोलतात मतदान करत नाहीत’


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत मांडलं. काही लोक धोरणात्मक बाबींवर नेहमी बोलत असतात. परंतु ते मतदानाला जात नाहीत. मतदान सक्तीचा विचार यासाठी होणे आवश्यक आहे. 


एकाच वेळी निवडणुका


राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुका घेणे ही दरवर्षीची प्रक्रिया आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित घेता येतील का, याचा विचार करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलताना केली आहे. एकत्रित निवडणुका घेतल्यास निवडणूक आयोग, प्रशासन व पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असं ते म्हणाले.
निवडणुकांतील गुन्हेगारीकरण ही गंभीर बाब असून गुन्हेगारी प्रवृत्तीला निवडणूक लढण्यापासून रोखले गेले पाहिजे, असंही ते म्हणाले.


पैशांचा वापर चिंतेची बाब


निवडणुकांमध्ये पैशाचा अतिरेकी वापर होतो ही चिंतेची बाब आहे. बऱ्याचदा निवडणुकीनंतर काही उमेदवारांकडून प्रति मतदान मी इतके पैसे दिले अशी भाषा कानावर पडते, त्यावेळेस चिंतेत अधिकच भर पडते. पैशाचा हा वापर थांबला पाहिजे. असं मतही त्यांनी व्यक्त केलं.