लॉकडाऊन उठवण्याबाबत मुख्यमंत्र्यांची एक अट
`लॉकडाऊन आपण हळू-हळू उठवत आहोत`
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र त्यानंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन उठवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक अट ठेवली आहे. लॉकडाऊन आपण हळू-हळू उठवत आहोत, यापुढे लॉकडाऊनमधून आणखी काय उघडत जाणार याची यादी देण्यात येईल, परंतु लॉकडाऊनबाबत एक अट असणार आहे. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरही राज्यात आम्ही आधी बघणार, कितपत गर्दी होते, गर्दी झाली तर सुरु केलेलं सर्व पुन्हा दुर्दैवाने बंद करावं लागले, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
जी दुकानं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, तेथे अजिबात गर्दी करायची नाही, सर्वांना सर्व काही मिळणार आहे. एखादी गोष्ट उघडल्यानंतर तेथे झुंबड होता कामा नये. एकदा उघडल्यानंतर ते पुन्हा गर्दीमुळे बंद होता कामा नये, याची खबरदारी सरकारने आणि सरकारपेक्षाही तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे. रांगा लावा, अंतर राखा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे.
लॉकडाऊन हे जसं अचानक लावणं योग्य नाही, तसं अचानक काढणंही योग्य नाही. अचानक लॉकडाऊन करणं आणि अचानकच लॉकडाऊन उठवणं म्हणजे एका पायावर कुऱ्हाड मारली आणि दुसऱ्या पायावरही मार तसं करायचं नाही. मात्र आपण हळू हळू गोष्टी पूर्वपदावर आणत आहोत. त्यामुळे आता लॉकडाऊन हा शब्द वापरु नका. जशा गोष्टी हळू-हळू बंद केल्या, तशाच आता हळू-हळू सुरु करत आहोत. काही गोष्टी रिओपन करताना खबरदारीने पाऊलं टाकावी लागणार आहेत.
राज्यातलं लॉकडाऊन कधी उठणार, उठणार की राहणार? लॉकडाऊनवर केवळ हो किंवा नाही बोलणं हा असा विषय नाही. कोरोना व्हायरसचा गुणाकार सतत वाढतो आहे. आणखी काही दिवसांत, आणखी काही रुग्ण वाढणार आहेत. मात्र डॉक्टर, नर्सेस, इतर जीवनावश्क सेवेतील कर्मचाऱ्यांनी काळजी करु नका, आपली कामं सोडू नका, तुमची जबाबदारी घेण्यास महाराष्ट्र सरकार समर्थ आहे, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
पुढचे काही दिवस मास्क लावावं लागणार आहे, सॅनिटायझर वापरायचं आहे, सतत हात धुवावे लागणार आहेत, रस्त्यावर थुंकू नये, कोरोनानंतरचं जग हे काहीसं असं असेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.