`हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी`
तर पलीकडचे राधाकृष्ण विखे-पाटीलही आमच्याकडे येऊन बसतील.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: मुख्यमंत्र्यांकडे ताकद असेल, हिंमत असेल तर पुढची विधानसभा निवडणूक जुन्या पद्धतीने बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी. म्हणजे महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे हे तुम्हाला कळेल, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत सरकारला दिले.
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी आपल्या भाषणाची सांगता करताना सरकारला हे आव्हान दिले. याबाबत बोलताना बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तर पलीकडचे राधाकृष्ण विखे-पाटीलही आमच्याकडे येऊन बसतील. कारण त्यांना ईव्हीएमचे प्रताप काय आहेत हे माहिती आहे, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.
या सरकारला माझे आव्हान आहे, बॅलेट पेपरवर एकदा निवडणूक घेऊन दाखवावी. या सभागृहाचा ठराव करा आणि निवडणूक आयोगाला येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची विनंती करा. त्यानंतर 'दूध का दूध, पानी का पानी' होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
अजित पवार यांनी ईव्हीएममध्ये घोळ नसल्याचे विधान केले होते. याकडे भाजपाचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी विधानसभेत लक्ष वेधून घेतले. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी ईव्हीएमबाबत जी भूमिका मांडली आहे त्याला माझे समर्थन असे सांगत अजित पवार यांनी घुमजाव केले.