पहिल्या दिवशी रेल्वे तिकीट खिडकीवर गोंधळ, वेळेत बदल करण्याची मागणी
लोकल प्रवासाची वेळ बदलण्याची आग्रही मागणी
अतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : आजपासून महिलांसाठी लोकल प्रवासाला मुभा देण्यात आल्याने महिला प्रवासी आनंदित असल्याचे दिसत आहे. तब्बल ७ महिन्यानंतर लोकल प्रवास करायला मिळत असल्याचा आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरु करावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. त्याचाच एक पहिला टप्पा म्हणून या महिलांच्या लोकल प्रवसाकडे पाहता येईल. लोकल प्रवासामूळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. तर लोकल प्रवासाची वेळ बदलण्याची आग्रही मागणीही यावेळी मोठ्या प्रमाणात व्यक्त करण्यात आली.
लोकल प्रवास सुरु झाल्याने आज डोंबिवली रेल्वे स्थानकात महिलांनी मोठी गर्दी केली होती. तिकीट काउंटर, रेल्वे प्लॅटफॉर्म भरलेला दिसू लागला. संपूर्ण डोंबिवली स्टेशन आज महिलामय झालेलं दिसून आले. अनेक महिन्यांनी लोकल प्रवास करायला मिळणार म्हणून महिलांकडून आनंद व्यक्त केला जात होता. त्यापैकी अनेक महिला या ७ महिन्यानंतर पहिल्यादा ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. तर लॉकडाऊनमूळे आपल्या नातेवाईकांकडे जाता न आल्याने काही जणी आपल्या आईला भेटण्यासाठी जात असल्याचे दिसून आले.
कोरोना व्हायरसच्या coronavirus पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या Lockdown लॉकडाऊनच्या काळानंतर आता अनलॉकच्या टप्प्याअंतर्गत मुंबईत अखेर सर्व महिलांना सरसकट लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नवरात्रोत्सवाचं औचित्य साधच सर्व महिलांसाठी लोकल सुरु करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेतला होता. पण, यामध्ये काही अडचणी आल्या होत्या. अखेर या अडचणी दूर झाल्या असून, महिलांसाठी Mumbai Local Trains लोकल प्रवासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
परिणामी सर्व महिला पुन्हा एकदा लोकलनं प्रवास करण्यासाठी निघू शकणार आहेत. खुद्द रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीच याबाबतची घोषणा केली. उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्यादरम्यान आणि सायंकाळी सात नंतर मुंबई उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केलं.
यापूर्वी फक्त सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. कोरोना व्हायरचा वाता प्रादुर्भाव पाहता वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठीच हे निर्बंध घालण्यात आले होते. पण, सहा महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर मात्र सर्वच स्तरांतून लोकल सेवा पुन्हा एकदा सुरु करण्याच्या मागणीनं जोर धरला.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून रेल्वेला पत्र पाठविण्यात आलं होतं. ज्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत, असं सांगत महिलांच्या लोकल प्रवासाला हिरवा कंदिल देण्यात आला. आता यामागोमाग सर्वच प्रवाशांसाठी मुंबई लोकल सेवा सुरु करण्याबाबतच्या बैठक आणि निर्णयाकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.