काँग्रेस, राष्ट्रवादीची खातेवाटपाची यादी मुख्यमंत्र्यांकडे
राज्यातली काँग्रेसची खातेवाटपाची यादी दिल्लीतील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचंही समजतंय
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचा खातेवाटपाचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आपापली खातेवाटपाची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे लवकरच खातेवाटप जाहीर होण्याची चिन्हं आहेत. राज्यातली काँग्रेसची खातेवाटपाची यादी दिल्लीतील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचंही समजतंय.
दरम्यान, मंत्रिमंडळ खातेवाटपाबाबतचा अंतिम निर्णय सोमवारपर्यंत होईल, असं राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. खातेवाटपाबाबत आता कोणतीही अडचण नाही. आणखी काही नवे विभाग तयार करता येतील का? यावर आता विचार सुरू असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय.
परंतु, खातेवाटपावरून राष्ट्रवादीत संभ्रम असल्याचं समोर आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री नवाब मलिक यांनी परस्परविरोधी दावे केलेत. अजित पवारांच्या म्हणण्यानुसार खातेवाटप आजच होणार आहे तर नवाब मलिक यांच्या दाव्यानुसार खातेवाटप सोमवारपर्यंत होईल. तर मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी खातेवाटप थोड्याच वेळात होईल, असा दावा केलाय. खातेवाटपाची वाटचाल अत्यंत कूर्मगतीने सुरू असल्याचं दिसून आलंय.