मुंबई :  काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ED raid on lawyer Satish Uke house)आज सकाळी छापेमारी सुरू केली होती. त्यानंतर त्यांना ईडीने आपल्या ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांचे भाऊ प्रदीप उके यांनाही ताब्यात घेतले. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पटोले यांची प्रतिक्रिया
या कारवाईवर नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात जो कोणी बोलेल, त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करुन कारवाई करुन तोंड बंद करण्याचं पाप हे भाजप जाणीवपूर्वक करतंय. केवळ सतीश उके प्रकरणातच नाही तर अनेक प्रकरणात अशी कारवाई केली जात आहे. 


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात पुराव्यासहित माहिती दिली. पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. भाजप हिटलरशाही करतेय, हुकुमशाही आणतंय, लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रकार सुरु आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. 


राज्याचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना मी विनंती करतो की या सगळ्या लोकतंत्राला वाचवण्यासाठी सुमोटो हस्तक्षेप करावा, जेणेकरुन हे लोकतंत्र वाचवण्यात यश येईल. भाजपच्या हिटलरशाहीने लोकशाही धोक्यात आली आहे असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.  


वकिल सतीश उके यांच्या घरातून काही फाईल, लॅपटॉप ईडीने जप्त केले आहेत. मुळात ईडीचा कायदा हा ड्रग माफियांसाठी, महिलांची परदेशात तस्करी करण्यासाठी, आतंकवादाविरोधात करण्यात आला होता. हा कायदा का आला होता, त्यावेळेस भाजपच्या खासदाराने परदेशात बाया नेण्याचं काम केलं होतं. पण आता वकिलांच्या फाईली जप्त करायला ईडीचा वापर केला जात आहे. 


सतीश उके यांनी जस्टीस लोया प्रकरणासह अनेक प्रकरणात स्पष्ट भूमिका मांडली आहे, त्यामुळे त्यांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. आमच्याकडे सगळा मसाला तयार आहे. एकच मारु लोहाप्रमाणे, भाजपासारखं टुच टुच करत बसणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. 


माझ्याकडे ईडी चौकशीला येत असेल तर स्वागत करु, स्वत: मी वाटल्यास ईडी कार्यालयात जाईन असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.