दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : बकरी ईदच्या प्रश्नावरुन काँग्रेस नेते नसीम खान यांनी आपल्याच सरकारवर निशाणा साधला आहे. बकरी ईद सण जवळ आला आहे. सरकारच्या गाईडलाईन्सनुसार ऑनलाईन खरेदी केली, पण आता बकरे घरपोच द्यायला आले, तर त्यांना वेशीवर अडवण्यात येतंय. सरकार शांत राहून तमाशा पाहत आहे का? असा सवाल काँग्रेस नेते नसीम खान यांनी विचारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या सूचना पोलीस ऐकत नाहीत का कागदावरच फक्त या गाईडलाईन्स आहेत? असंही नसीम खान यांनी विचारलं आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे. त्यामुळे बकरी ईदच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने सरकारला घरचा आहेर दिला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात बकरी ईदबाबत सरकारने काही निर्बंध आणले आहेत. 


सोमवारी शरद पवार यांच्याकडे बकरी ईदच्या प्रश्नावरुन बैठकही झाली होती. यानंतर नवाब मलिक यांनी बकरी ईदबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. लॉकडाऊनदरम्यान बोकड कापताना कोणतीही बंदी नव्हती आणि आताही नाही. बकरी ईदबाबतचे गैरसमज गृहमंत्री अधिकाऱ्यांशी बोलून दूर करतील, असं नवाब मलिक सोमवारी म्हणाले होते. 


मुंबई शहरामध्ये बकरी आणण्यासाठी कोणतीही वाहतुकीची अडचण नाही. ऑनलाईन बकरी बूक केली असेल, तर वाहतुकीशिवाय बकरी येऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांकडे हे सगळे विषय ठेवण्यात आले आहेत. कुर्बानीवर बंदी नाही. गृहमंत्र्यांनी दिलेल्या गाईडलाईनमध्ये कोणताही निर्बंध नसल्याचं, नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं होतं.