दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना यावर्षी एकही पदक मिळालेले नाही. त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना तब्बल ५८ पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान गाणाऱ्या व महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक राज्यातील भाजपा नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना, अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासदंर्भात सावंत पुढे म्हणाले की, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या तपासावरून मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्याचा कृज्ञघ्नपणा महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी वारंवार केला आहे. मुंबई पोलीस सुशांतसिंह प्रकरणाचा तपास उत्तमरित्या करत असताना त्यांच्या तपासावर संशय घेणे, तपास सीबीआयला देण्याची मागणी करणे तसेच पोलीस महासंचालकांना रजेवर पाठवा अशा पद्धतीने सातत्याने मुंबई पोलीसांवर अविश्वास दाखवून एकप्रकारे त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम या मंडळींनी केले आहे आणि आजही करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने मुंबई व महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांना पदकं देऊन त्यांचा सन्मान करुन त्यांच्या कामावर  विश्वास असल्याचेही दाखवून दिले आहे ही राज्यातील भाजप नेत्यांचा मोठी चपराक आहे.  

मुंबई पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवत बिहार पोलिसांचा मात्र या लोकांना चांगलाच पुळका आलेला दिसत आहे. बिहार पोलिसांना सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करु द्या, त्यांच्या अधिकऱ्यांना क्वारंटाईन करणे अयोग्य आहे असे गळे काढण्यात आले. बिहार पोलिस मुंबईत येऊन व बिहार चे डीजीपी माध्यमातून जाहीरपणे मुंबई पोलीसांचा अवमान करत होते त्यावेळी महाराष्ट्राच्या भाजपा नेत्यांना आनंद होत होता.

वास्तविक पाहता मुंबई पोलीस दल हे जगातील उत्तम पोलिस दलांपैकी एक आहे. याच मुंबई पोलीसांनी आतापर्यंत कठीणातील कठीण गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल असे उत्तम काम केलेले आहे. 
मागील पाच वर्षे याच पोलिस दलाचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून काम पाहिले आणि सत्ता जाताच सहा-सात महिन्यात त्याच पोलिसांवर त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांना विश्वास दाखवता येऊ नये हे दुर्दैवी आहे, असेही सावंत म्हणाले.