केजरीवालांचं कौतूक केल्याने मिलिंद देवरांवर काँग्रेस नेत्यांची टीका
मिलिंद देवरा सध्या चर्चेत आले आहेत
मुंबई : काँग्रेसचा कॉर्पोरेट आणि हुशार चेहरा म्हणजे मिलिंद देवरा यांच्याकडे पाहिलं जातं. काँग्रेसशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या मुरली देवरांचे हे चिरंजीव सध्या चर्चेत आले आहेत. केजरीवालांचं कौतुक केल्याने त्यांच्यावर पक्षातूनच टीका होऊ लागली आहे.
'केजरीवाल सरकारने महसूल ६० हजार कोटींवर नेला आहे. महसूल वाढ तब्बल ५ वर्षे टिकवली. दिल्ली हे देशातलं आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे.' त्यावर दिल्लीतले काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी जोरदार पलटवार केला आहे.
देवरा तुम्हाला काँग्रेस सोडायची असेल तर कृपया सोडा, पण खोट्या प्रचाराला बळी पडू नका. काही माहिती नसलेल्या गोष्टी सांगतो. काँग्रेसच्या काळात महसुलात १४.८७ टक्के वाढ झाली होती. आपच्या काळात महसूल वसुली ९.९० टक्के आहे.
काँग्रेस नेत्या अलका लांबाही देवरांवर तुटून पडल्या आहेत. आधी वडिलांच्या नावावर पक्षात या, घरबसल्या तिकीट मिळवा. केंद्रीय मंत्री व्हा, मग स्वतःच्या बळावर लढायची वेळ येईल, तेव्हा हरा, मग पदासाठी भांडा, स्वतःच्याच पक्षाला शिव्या द्या आणि दुसऱ्यांच्या कौतुकाचं गिटार वाजवत राहा. अशा शब्दात त्यांनी देवरांवर टीका केली आहे.
देवरांनी या ट्विटला उत्तर देत म्हटलं की, 'आपबरोबर आघाडीचा गोंधळ घालण्यापेक्षा शीला दीक्षितांनी केलेल्या कामाचा प्रचार केला असता तर पक्ष आज सत्तेत असता.'
याआधीही मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांचा वाद उघड झाला होता. तसंच देवरांनी याआधीही मोदींचं गुणगानही केलं होतं. इकडे मिलिंद देवरा काँग्रेसला घरचा आहेर देत असताना तिकडे मध्य प्रदेशातही मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यातला विसंवादही पुढे येतो आहे. पण पराभवानंतर एकमेकांना लाथाळ्या मारायच्या, ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यातली एनर्जी काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीआधी खर्ची घातली असती तर थोडं तरी चित्र वेगळं असतं.