मंत्रिमंडळ विस्ताराआधी काँग्रेसमधील नाराजी नाट्य समोर
काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी काँग्रेसमधील नाराजी नाट्य समोर आलं आहे. खातेवाटपात काँग्रेसला ग्रामीण भागाशी संबंधित एकही महत्त्वाचं खातं मिळालेलं नाही. कृषी, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा या चार महत्वाच्या खात्यापैकी एकही खातं काँग्रेसकडं नाही. त्यामुळं काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खातेवाटपाच्या चर्चेत याबाबत ठोस भूमिका न मांडल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे. ग्रामीण भागाशी संबंधित एखादं जादा खातं पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा खटाटोप सुरू झाला आहे.
येत्या ३० डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यासाठी महाविकासआघाडीने तयारी देखील केली आहे. या विस्तारात नव्या ३६ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राज भवनाऐवजी विधान भवनात हा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला मंत्र्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते, आमदार तसंच राजकीय नेते असा मोठा लवाजमा उपस्थित राहणार असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं हा बदल करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्याची तयारी विधान भवनात सुरु झाली आहे. पण त्याआधी काँग्रेसमधील नाराजी समोर आली आहे.
याआधी ही काँग्रेसच्या मंत्र्यांची नावं निश्चित न झाल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढं ढकलण्यात आला होता. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार आहे. मात्र काँग्रेसकडून नावंच आली नसल्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार पुढं ढकलण्यात आल्याचं या भेटीनंतर समोर आलं होतं.
या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे १३, राष्ट्रवादीचे १३ तर काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांचा शपथविधी गेल्या २८ नोव्हेंबरला पार पडला होता.