महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची पोलिसांकडून धरपकड
Maharashtra Congress Activists aggressive : महागाईविरोधात मुंबईत काँग्रेस अधिक आक्रमक झाली आहे. महागाई हटवा, गरीब वाचवा, अशा आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्यात. यावेळी मोर्चा काढणाऱ्यांना गिरगाव चौपाटीवर पोलिसांनी धरपकड केली.
मुंबई : Maharashtra Congress Activists aggressive : महागाईविरोधात मुंबईत काँग्रेस अधिक आक्रमक झाली आहे. महागाई हटवा, गरीब वाचवा, अशा आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्यात. महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पाहत आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला आहे. याविरोधात आज राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, आमचे आंदोलन पोलिसांच्या माध्यमातून दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. मुंबईत मोर्चा काढणाऱ्यांना गिरगाव चौपाटीवर पोलिसांनी धरपकड केली.
काँग्रेसने देशभरात महागाईविरोधात आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. महागाईविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली आहे. ED सरकारच्या दबावतंत्रासमोर आम्ही झुकणार नाही, जनतेचे प्रश्न मांडण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही, असेही काँग्रेसने ट्वीट करत म्हटले आहे.
मुंबईत काँग्रेस नेत्यांना विधानभवनातच अडवले. राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्यां आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केली आहे. यावेळी काँग्रेस नेत्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला आणले गेले. ईडी कारवायांचा काँग्रेसकडून आंदोलनादरम्यान निषेध करण्यात आला. महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक होत हा विरोध केला.
मुंबईच्या गिरगावमध्ये काँग्रेसच्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. आंदोलन करण्याआधीच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांना देखील पोलिसांनी अडवलं आणि ताब्यात घेतले. यावेळी 'झी 24 तास'शी बोलताना प्रज्ञा सातव यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
काँग्रेस नेत्यांना विधानभवन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना ताब्यात घेतले गेले आहे.