मुंबई : काँग्रेस आघाडीतील घटक पक्ष आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. घटक पक्षांचे समन्वयक राजू शेट्टी मुंबईत नसल्याने ही बैठक होणार नाही. मात्र या घटक पक्षांनी आपला प्रस्ताव काँग्रेसकडे दिला आहे. आघाडीत घटक पक्षांना ५५ ते ६० जागा हव्या आहेत. याबाबत आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे घटक पक्षांचे लक्ष लागले. घटक पक्षांनी एवढ्या जागा मागितल्या असल्या तरी यात तडजोड करण्याचीही घटक पक्षांची तयारी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली जाणार आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे आहेत. काँग्रेसची पहिली यादी लागली असून या यादीत पन्नास जणांची नावे आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांच्याऐवजी पक्षाने अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर दक्षिण कराडमधून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव या यादीत असल्याने ते लोकसभा पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट होते. 


तर राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १२५ आणि राष्ट्रवादीही १२५ जागा लढणार आहे. तर उरलेल्या ३८ जागा या घटकपक्षांना देण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला आलेल्या १२५ जागांपैकी पाच जागांवरील उमेदवारांची नावे बुधवारी शरद पवारांनी जाहीर केली. परळीमधून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, गेवराईतून विजयसिंह पंडित, माजलगावमधून प्रकाश सोळंके आणि केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.