काँग्रेस-राष्ट्रवादीला हादरवणाऱ्या दुसऱ्या मेगाभरतीसाठी भाजपाची व्युहरचना
विरोधी आघाडीतले अनेक विद्यमान आमदार भाजपात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत... पाहा, कुणाकुणाची नावं आहेत त्यात...
दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : भाजपामधील घाऊक भरतीचा पुढचा अंक लवकरच सुरू होणार आहे. पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याची व्यूहरचना भाजपानं आखली आहे. भाजपातल्या मेगाभरतीचा ट्रेलर नुकताच आपण पाहिला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांसह बड्या नेत्यांनी भाजपात वाजत-गाजत प्रवेश केला. आता मेगाभरतीचा पुढचा अंक लवकरच रंगणार आहे.
विरोधी आघाडीतले अनेक विद्यमान आमदार भाजपात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे अक्कलकोटचे सिद्धाराम म्हेत्रे, पंढरपूरचे भारत भालके, सिल्लोड औरंगाबादचे अब्दुल सत्तार, माण साताऱ्याचे जयकुमार गोरे, गोंदियाचे गोपालदास अग्रवाल आणि सावनेर, नागपूरचे सुनील केदार यांचा समावेश आहे.
त्याशिवाय राष्ट्रवादीचे माढाचे आमदार बबनदादा शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल, उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी भाजपाच्या संपर्कात आहेत. तर श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या संपर्कात आहेत.
त्याशिवाय उत्तर महाराष्ट्रातही मोठं खिंडार पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठी स्वतः गिरीश महाजन प्रयत्नशील असल्याची माहिती 'झी २४ तास'ला मिळालीय.
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि त्यांचा मुलगा विशाल देवकर, धुळ्यातील साक्रीचे काँग्रेस आमदार डी. एस. अहिरे हे भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
धुळ्यातील भाजपा आमदार अनिल गोटे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलंय. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना उतरवण्याची तयारी भाजपानं केलीय.
राष्ट्रवादीचे पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, धुळ्यातील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनाही पक्षात घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
अंमळनेरचे भाजपाचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, यासाठी भाजपाकडून दबाव टाकला जात असल्याची माहिती आहे.
एकंदरीत भाजपातील इनकमिंग यापुढंही सुरूच राहणार आहे. विरोधी आमदारांना भाजपात घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीचं खच्चीकरण करण्याचा राजकीय डाव भाजपानं आखलाय.