दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने राज्यात त्यांच्या आणि मित्रपक्षांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान मिळवलं आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फुटलीच, शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर विरोधात असलेल्या इतर लहान पक्षांनीही भाजपाच्या उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकली. विरोधकांची मते फोडल्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, तर विरोधकांची मतं फुटल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत जादा मते घेऊन भाजपाने शिवसेनेलाही सूचक इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांची मतं फुटू नयेत म्हणून काँग्रेसने सुरुवातीपासून काळजी घेतली होती. काँग्रेसच्या उमेदवार मीरा कुमार यांनी मुंबईत येऊन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या लहान पक्षांच्या आमदारांचीही भेट घेतली होती. मात्र याचा फायदा प्रत्यक्ष निवडणुकीत झाला नाही. विरोधकांची मतं फुटली आणि भाजपाला या निवडणुकीत आपल्या आणि मित्रपक्षांच्या संख्येपेक्षा 16 मतं जास्त मिळाली.



विरोधकांकडे काँग्रेसची 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 41 अशी मिळून 83 मते होती. मात्र काँग्रेसच्या उमेदवार मीरा कुमार यांना केवळ 77 मते मिळाली. याचाच अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 6 पेक्षा जास्त मते फुटली आहेत. एवढंच नव्हे तर या दोन पक्षांबरोबर असलेल्या शेकाप, समाजवादी पार्टी, एमआयएम, भारीप या पक्षांनीही भाजपाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या पारड्यात मतं टाकल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय.


दुसरीकडे भाजपाकडे स्वतःची 122, शिवसेनेची 62, अपक्ष 7, रासप 1 अशी 192 मते होती. मात्र भाजपाच्या उमेदवाराला 208 मते मिळाली. याचाच अर्थ भाजपाला 16 मते जास्त मिळाली. यातील शिवसेनेची 62 मते वगळली तर भाजपाला 145 मते मिळाली आहेत. म्हणजेच राज्यात सत्तेचा सोपान गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या 144 मतांपेक्षा भाजपाला एक जास्त मत मिळालं आहे. 


 शिवसेना वारंवार भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते, अनेक विषयांवर सरकारविरोधात भूमिका घेते. शिवसेनेशिवाय बहुमतापेक्षा जास्त मते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मिळवून शिवसेनेला भाजपाने एकप्रकारे इशारा दिल्याचं बोललं जातंय. 


शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी आपण स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतो, असा इशारा भाजपाने जरी आकड्यांद्वारे दिला असला तरी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान होतं हे लक्षात घ्यायला हवं. गुप्त मतदान करणं आणि उघडपणे सरकारला पाठिंबा देणं यात फरक आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पारड्यात मतं टाकणारे आमदार उघडपणे सरकारला पाठिंबा देतीलच असेही नाही.


दुसरीकडे विरोधकांची मते फुटल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. एकीकडे हे दोन्ही पक्ष सरकारविरोधात संघर्ष पेटवत असताना त्यांना स्वतःचेच आमदार एकत्र ठेवता आलेले नाहीत. दोन्ही पक्षातील कोणत्या आमदारांची मते फुटली याबाबत मात्र उत्सुकता आहे. त्यातच काँग्रेसमधूनच संशयाची सुई नारायण राणे आणइ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे वळवली जात आहे. नारायण राणे भाजपामद्ये जाणार अशी जोरदार चर्चा आहे.त्यामुळे त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे आणि राणे समर्थक आमदार कालिदास कोळंबकर यांची मते भाजपाच्या पारड्यात गेली असावीत असा संशय काँग्रेसचे नेते खाजगीत व्यक्त करत आहेत. दुसरीकडे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांशी असलेल्या मैत्रीबाबत जाहीर वक्तव्य केल्याने त्यांचे आणि त्यांचे समर्थक आमदारांची मते भाजपाच्या पारड्यात गेली असावीत असा संशय काँग्रेसलाच आहे. काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या या संशयामुळे आधीच अडचणीत असलेला पक्ष आणखी अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. पक्षातील नेत्यांचाच एकमेकांवर विश्वास नसल्याने भविष्यात काँग्रेसला आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र तुरुंगात असलेले आमदार रमेश कदम वगळता आपली मते फुटली नसल्याचा दावा केला आहे. 


 एकूणच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. या निवडणुकीच्या निकालाने एकीकडे विरोधकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण केले असल्याने त्यांच्या विरोधाची धार आगामी पावसाळी अधिवेशनात काहीशी कमी होईल अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे वारंवार भाजपाविरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेलाही या निकालाने एक पाऊल मागे यावे लागण्याची चिन्हं आहेत.