दीपक भातुसे, मुंबई : काँग्रेसचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेसने मंजूरीसाठी अद्याप विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलेला नाही. त्यामुळे विखेंबाबत काँग्रेसची भूमिका एवढी नरमाईची का अशी चर्चा सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. मात्र राज्यातील निवडणुका पार पडून आता २० दिवस उलटून गेले तरीही काँग्रेसने अद्याप कारवाईबाबत निर्णय घेतलेला नाही. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा मंजूरीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणे गरजेचे होते. मात्र काँग्रेसने अद्याप हा राजीनामा मंजूरीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलेला नाही. त्यामुळे काँग्रेसची विखेंबाबत वेट अॅण्ड वॉचची भूमिका का अशी चर्चा पक्षातच सुरू झाली आहे. 


येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालानंतर काँग्रेस आपल्या बंडखोर आमदार आणि पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई करायची की नाही याबाबत पक्ष निर्णय घेणार आहे. नगरचा निकाल विखे यांच्याविरोधात गेला तर पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी विखे पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय होऊ शकतात अशी आशा काँग्रेसला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळेच विखे यांच्यांसह इतर आमदारांवरील कारावाईबाबत काँग्रेस अद्याप निर्णय घेत नसल्याची पक्षात चर्चा आहे. 


विखे यांच्याबरोबर लोकसभेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात काम करणाऱ्या आमदार सतेज पाटील, कालिदास कोळंबकर, नितेश राणे यांच्याविरोधात काँग्रेसकडून कारवाईचं चित्र हे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काय राजकीय परिस्थिती असेल त्यावर अवलंबून असणार आहे.