काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी : `मी मिरवणार, सगळ्यांची जिरवणार`
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अडचणीत असलेल्या काँग्रेस पक्षाला एक - एक नेता सोडून चालला आहे. जेव्हा सत्ता
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अडचणीत असलेल्या काँग्रेस पक्षाला एक - एक नेता सोडून चालला आहे. जेव्हा सत्ता होती तेव्हा पक्ष वाढवण्याऐवजी काँग्रेसचे नेते एकमेकांची जिरवण्याच्या प्रयत्नात होते. आता पक्ष अडचणीत असतानाही तेच सुरू असल्याचं दिसतंय. पाहूयात एक रिपोर्ट...
मी मिरवणार आणि सगळ्यांची जिरवणार, असं करता करता पक्षाचीच जिरवण्याचा सिलसिला काँग्रेसमध्ये आजही सुरू आहे. पक्ष सत्तेवर असताना काँग्रेस नेते स्वतःची मिरवत आणि इतरांची जिरवत आले. आता पक्षाची वाताहत झाली असताना ही जुनी खोड विसरायला काँग्रेस नेते तयार नाहीत.
पक्ष सत्तेत असताना
विलासराव देशमुख विरुद्ध अशोक चव्हाण
नारायण राणे विरुद्ध अशोक चव्हाण
नारायण राणे विरुद्ध विलासराव देशमुख
बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे-पाटील
नितीन राऊत विरुद्ध सतीश चतुर्वेदी
अशोक चव्हाण विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण
अशी पक्षात गटबाजी पहायला मिळाली. यातील काही नेते सध्या हयात नाहीत, तर काही नेत्यांनी पक्षाला रामराम केलाय. एकीकडं उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला तरी मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा भर ओसरत नाहीए.
दुसरीकडं नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांच्या संघर्षामुळं पोलखोल यात्रादेखील फोल ठरलीय. आपला वरचष्मा, आपली खुर्ची आणि आपली सत्ता ही रमी जुळवण्यात काँग्रेसचे नेते तेव्हाही मश्गुल होते, आजही मश्गुल आहेत.
उद्याचं चित्र वेगळं असेल, असं वाटण्यासारखं काहीच घडत नाहीए. थोडक्यात काय, तर पक्षाला सोनियाचे दिन आणण्याऐवजी आपलं सोनं करून घेण्यातच काँग्रेस नेते रममाण आहेत.