दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेतही नवी राजकीय समीकरण जुळविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली सुरु आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड आज दिल्लीत असून याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. महापौरपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला तर उपमहापौरपदासाठी काँग्रेस उमेदवार देणार असल्याची ही शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाला दूर ठेवण्यासाठी आता मुंबई महापालिकेतही रणनिती आखली जात आहे. सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे 83, शिवसेनेचे 94, काँग्रेसचे 29 आणि राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत.


राज्य पातळीवर एकत्र येणारे हे तीन पक्ष मुंबई महापालिकेतही एकत्र येण्याच्या हालचाली सुरु आहेत. महापौर आणि उपमहापौरपदासाठी 18 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची मुदत असून 22 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.


विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही ही पक्ष मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडायला तयार नसल्याने अखेर शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे.