मुंबई : काँग्रेसला मोठ्या पराभवाला या निवडणुकीत सामोरे जावे लागणार आहे. काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंच्या तोफा धडाडल्या. यावेळी मोदींनी विरोधकांना इशारा दिला आहे. पुन्हा पंतप्रधान झाल्यास भ्रष्टाचारी नामदारांना तुरूंगात धाडणार, असा मोदींनी सूचक इशारा दिला आहे. यावेळी मुंबईतल्या बीकेसीमध्ये झालेल्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार घणाघाती हल्ला चढवला. दरम्यान, पंतप्रधानांच्या मुंबईतील सभेत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पूत्र अनंत अंबानी पहिल्या रांगेत दिसून आलेत. काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर अंबानींचा डॅमेज कंट्रोल असल्याची चर्चा सुरु झाली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी उद्धव ठाकरे छोटा भाऊ असल्याचा उल्लेख केला. वाराणसी या संस्कृतीच्या नगरीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि समृद्ध असलेल्या मुंबईत आशीर्वाद घेण्यासाठी आलो. संस्कृती आणि सामर्थ्य ही भारताची शक्ती, असे मोदी म्हणालेत.


विकल्पाची नाही ही संकल्पाची निवडणूक आहे. जे राजकीय नेते जुन्या विचारांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना २१ व्या शतकातील युवा वर्गाची नस ओळखू शकत नाही. तर दुसरीकडे भाजप २८२ चा आकडा पार करणार की, नाही ही चर्चा आहे. मात्र, आमचे एनडीए ३००, ३२५ की ३५० पार करणार ही चर्चा आहे. महात्मा गांधींनी काँग्रेस विसर्जित करायला सांगितली होती. आता ते काम तुम्ही करा. काँग्रेस ४४ आकडा पार करणार की, ४० जागा मिळवणार ही चर्चा आहे. तीन टप्प्याच्या निवडणुकीनंतर एनडीए सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले आहे, असे मोदी म्हणालेत.


दहशतवादी हल्ल्यानंतर केवळ मंत्री बदलण्याची संस्कृती आम्ही बदलली आहे, आम्ही अतिरेक्यांना ठार केले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. आता अतिरेक्यांना घरात घुसून मारणार, असे मोदी म्हणालेत. आजपर्यंत मुंबईसाठी ३५ हजार पोलीस शहीद झाले. या शहीद पोलिसांच्या नावाने एक राष्ट्रीय स्मारक असायला हवे होते. मात्र, मुंबईवरील हल्ल्यानंतर काँग्रेसने केवळ मंत्री बदलले. मुंबईवरील हल्ल्यानंतर काँग्रेस केवळ हातावर हात ठेवून बसलेत. मुंबईवरील पाकच्या हल्ल्याला काँग्रेसनं उत्तर दिलं नाही, अशी टीका मोदी यांनी केली.



डिजिटल इंडिया मोहिमेमुळे लोकांचे पैसे वाचले आहेत. तर येणाऱ्या काळात मुंबईत पावणे तीनशे किलोमीटरवर मेट्रो धावणार आहे. मुंबईचे लोक हवेची दिशा अचूक ओळखतात. पुढची पाच वर्ष भारतासाठी खूप महत्वाची आहे. २०१४ मध्ये काँग्रेसने सर्वात कमी जागा जिंकल्या आणि २०१९ मध्ये काँग्रेसने सर्वात कमी जागा लढवल्या. त्यामुळे त्यांना यश मिळणार नाही, हे स्पष्ट झालेय, असे मोदी म्हणालेत.