काँग्रेस विरोधी बाकांवरच बसणार; शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता
लोकांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्यासाठी मते दिली आहेत.
नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाने सत्तेत सहभागी न होता विरोधी बाकांवरच बसण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांना याविषयी माहिती दिली. राज्यातील सत्तास्थापनेच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण आज सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल गेले होते. मात्र, त्यांना सोनिया गांधी यांच्या भेटीविनाच माघारी परतावे लागणार आहे.
सोनिया गांधी यांनी या तिन्ही नेत्यांना फोन करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करायला सांगितली. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विरोधी बाकांवरच बसणार असल्याचे स्पष्ट केले.
मात्र, दुसरीकडे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे समजते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याविषयी चर्चा झाली. शिवसेना कट्टर हिंदुत्त्ववादी विचारसरणीचा पक्ष असल्याने काँग्रेसला त्यांना थेट पाठिंबा देणे शक्य नाही. मात्र, तरीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती. परंतु, आगामी काळात भाजपकडून याचे राजकीय भांडवल केले जाऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसश्रेष्ठींनी हा निर्णय टाळल्याचे बोलले जाते. त्यामुळेच आज सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नाही. त्याऐवजी के.सी. वेणुगोपाल यांनी या नेत्यांशी चर्चा केली.
दरम्यान, शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेला भाजपनेही जशास तसे उत्तर द्यायचे ठरवले आहे. त्यामुळेच येत्या पाच किंवा सहा तारखेला भाजपकडून मंत्रीमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता शिवसेना काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. परिणामी आता सभागृहात काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.