अजित पवार यांच्याविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र? राजकीय वर्तुळात खळबळ
अजित पवार यांची अडचण कोण वाढवत आहे? पाहा कोणी केलाय गंभीर आरोप
सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : देहू इथं संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात आधी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाषण केलं. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाषण केलं नाही. यावरुन बरचं राजकारण रंगलं.
यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली होती. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना भाषणाला संधी द्यायला हवी होती, अजित पवार यांना मुद्दामहून भाषण करुन दिलं नाही, त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला आहे असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता.
सुप्रिया सुळे यांनी आरोप केल्यानंतर अेक नेत्यांनीही या मुद्दयावर टीका केली होती. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनंही करण्यात आली होती. आपल्याला काहीच बोलायचं नाही, आता पंतप्रधानही दिल्लीत गेले आहेत असं सांगत अजित पवारांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.
आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांच्यातील संबंध चांगले आहेत, पण कदाचित ते कुणाल पहावत नाहीत, अंतर्गत संघर्षामुळेच अजित पवार यांना भाषणाची संधी दिली नाही असा आरोप करुन अजित पवार यांची अडचण वाढवत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
नियोजित कार्यक्रमात अजित पवार यांचं नाव न घेता थेट पंतप्रधानांचं नाव भाषण घेतलं गेलं. त्यानंतर स्वतः पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांना तुम्ही भाषण करा असं म्हटलं. मात्र अजित पवार यांनी त्यास नकार दिला. पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्नेह चांगले आहेत.
पण या चांगल्या कार्यक्रमात मिठाचा खडा कोणी टाकू पाहत आहे की काय अशी शंका येते अशी टीका फडणीस यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली आहे. मला तर वाटतं, हे अजित पवारांविरोधात षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.