मुंबई : राज ठाकरेंनी शिवरायांच्या रायगडावरील समाधीबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटलाय. राज ठाकरेंचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळून लावलाय. तर इतिहासकारांनीही राज ठाकरेंवर टीका केलीय. नेमका वाद काय आणि त्यावरून कसं राजकारण रंगलंय त्यावरचा हा रिपोर्ट. (controversy in ncp and mns over to who built shivaji maharaj mausoleum)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंनी प्रत्येक सभेत इतिहासातल्या घटनेबाबत वक्तव्य केलं आणि वाद झाला. औरंगाबादेतल्या सभेतही राज ठाकरेंनी शिवरायांच्या समाधीबाबत वक्तव्य केलं आणि मोठ्या वादाची ठिणगी पडलीय. 


पवारांवर जातीयवादी असल्याचा आरोप करताना त्यांनी थेट शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या मुद्याला हात घातला आणि ही समाधी टिळकांनी बांधल्याचा दावा केला. नेमकं काय म्हटले राज ठाकरे ते त्यांच्या तोंडूनच ऐकूयात.


आता या वक्तव्यावर वाद झाला नसता तरच नवल. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीनं तीव्र आक्षेप घेतला. भुजबळांनी थेट इतिहासातले दाखले देत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. 


लोकमान्य टिळक यांनी नव्हे तर शंभू महाराज यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधली आहे. टिळकांनी जमा केलेला निधी बँकेतच बुडाला. टिळक दोन वेळेस गेले पण त्यांना समाधी सापडली नाही. इतिहासकारांचे दाखले देत भुजबळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 


तर इतिहासकारांनीही राज ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेत टिळकांनी समाधी बांधल्याचा दावा खोडून काढला. टिळकांनी केवळ समाधी उभारण्यासाठी निधी जमा केल्याचा दावा इतिहासकारांनी केलाय. 


राज ठाकरेंच्या पहिल्या सभेतल्या भाषणानंतर जेम्स लेनंच भूत महाराष्ट्रात पुन्हा परतलं होतं. आता औरंगाबादच्या भाषणात शिवरायांच्या समाधीवरून केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण झालाय.


कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेतलेले राज ठाकरे मात्र पुन्हा पुन्हा इतिहास उकरून वर्तमान आणि भविष्यातली लढाई जिंकू शकतील का हा खरा प्रश्न आहे.