दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : मेट्रो ३च्या आरे कारशेडचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. पर्यावरण प्रेमींनी आक्षेप घेतल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेनेही झाडे तोडण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. मेट्रो ३चे नियोजीत कारशेड आरे परिसरात असल्याने त्यासाठी हजारो झाडं तोडण्याची वेळ मेट्रो प्राधिकरणावर आली आहे. त्यासाठी तब्बल 2 हजार 238 झाडं तोडण्याचा प्रस्ताव 2017 मध्येच वृक्ष प्राधिकरणाकडे देण्यात आला होता. पण या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाने यासंदर्भात पर्यावरण प्रेमी तसेच वृक्षप्रेमींचे म्हणणे ऐकून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार वृक्ष प्राधिकरणाकडे तब्बल 80 हजाराहून अधिक आक्षेप नोंदवण्यात आलेत. त्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाने फेटाळून लावला आहे.
  
आरे जंगल असल्याने तब्बल 2238 झाडे तोडून पर्यावरणाचे मोठं नुकसान होणार आहे. 27 आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन कुठे करणार ? आरेतली झाडं तोडण्याला शिवसेनेचा विरोध आहे. कारशेडला पर्यायी जागा शोधण्याची मागणी होते आहे. या सगळ्या कारणांमुळे प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.


या प्रकरणी आता वृक्ष प्राधिकरणाच्या मागणीनुसार पुढच्या आठवड्यात जागेची पाहणी केली जाणारेय त्यानंतर निर्णय होईल. दरम्यान, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.