`पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंनी वांद्र्याला जायची गरज`, आशिष शेलारांचा निशाणा
लॉकडाऊनमध्येही वांद्रे स्टेशन परिसरात हजारो मजूर जमल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई : लॉकडाऊनमध्येही वांद्रे स्टेशन परिसरात हजारो मजूर जमल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावरूनच आता भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकारण तापू लागलं आहे. वांद्रे स्टेशनवर गर्दी जमल्याबद्दल आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
'पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंनी घटनास्थळी तातडीने जायची गरज होती, नाही तर किमान खरी माहिती घेणं अपेक्षित होतं. चार-पाच दिवसांपूर्वी बांधकाम आणि नाका कामगार संघटनेने या परिसरात निदर्शने केली होती, ती निदर्शने सरकारने गांभीर्याने का घेतली नाहीत? सरकारने संघटनेशी चर्चा का केली नाही? त्यांची मागणी रेशनींगचे धान्य आणि अन्न मिळावं ही होती. मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाली, हे सरकार गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांचं अपयश नाही का?' असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.
'नाका व बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देणे असलेली हक्काची मदत या कामगारांना अजून का मिळाली नाही? ती फाईल कुठल्या टेबलवर का अडकुन पडलेय ? असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
'केंद्र सरकारने कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे वांद्रे स्टेशनबाहेर अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरतमध्ये झालेली दंगलही याचाच परिणाम आहे. या कामगारांना अन्न किंवा घर नकोय, त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे,' असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.
'ज्या दिवसापासून ट्रेन बंद झाल्या तेव्हापासून आणखी २४ तासांसाठी ट्रेनसेवा सुरू ठेवावी, ज्यामुळे परराज्यातले कामगार त्यांच्या घरी परत जातील, अशी विनंती आम्ही केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही हा मुद्दा उपस्थित केला होता. परराज्यातल्या कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची विनंती उद्धव ठाकरेंनी मोदींना केली होती,' असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.