मुंबई : काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना व्हायरसची लागण झाली. कोरोनावरच्या उपचारांसाठी अशोक चव्हाण नांदेडवरून मुंबईत दाखल झाले. मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात अशोक चव्हाणांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातूनच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या स्पिकअप इंडिया या अभियानात सहभाग नोंदवला. यासाठी अशोक चव्हाणांनी रुग्णालयातूनच एक व्हिडिओ फेसबूकवर शेयर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात. केंद्राकडून भरीव मदत मिळत नसल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. गरीब कुटुंबांच्या बॅंक खात्यात एकरकमी १० हजार रूपये जमा करावेत. तसेच कॉंग्रेस पक्षाने सुचवलेल्या 'न्याय' योजनेनुसार पुढील सहा महिने त्यांच्या खात्यात दरमहा ७ हजार ५०० रूपये जमा करावेत, अशी मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे.


वेगवेगळ्या राज्यांमधून मजूर त्यांच्या मूळ राज्यात जात आहेत. त्यांच्या प्रवासाचा आणि खाण्यापिण्याचा सर्व खर्च सरकारच्या स्तरावर झाला पाहिजे. ते गावात गेल्यानंतर त्यांना वर्षातून २०० दिवस रोजगार मिळावा, यादृष्टीने नियोजन केले पाहिजे, असंही अशोक चव्हाण म्हणाले. 


केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजमध्ये उद्योगांना कर्ज देण्याची घोषणा केली आहे, पण ही वेळ उद्योगांना कर्ज देण्याची नाही, तर थेट आर्थिक मदत देण्याची आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली. तसंच कर्जांचे हफ्ते आरबीआयने पुढे ढकलले असले, तरी सरकारने बँकांशी चर्चा करावी आणि विशिष्ट कालावधीचं व्याज माफ करावं, अशी मागणीही अशोक चव्हाणांनी केली.