कोरोना । राज्यात ९५ हजार गुन्हे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ६६३ जणांना अटक
कोरोना संकटामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार गुन्ह्यांची नोंद.
मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या. त्यात ६६३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत,अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या २२ मार्च ते ५ मे या कालावधीत कलम १८८ नुसार ९५,६७८ गुन्हे नोंद झाले आहेत. १८,७२२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ५१ लाख ३८ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या १०० नंबरवर अनेक तक्रारांचे कॉल्स आले आहेत. ८४,९४५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
२,११,६३८ व्यक्ती क्वारंटाईन
तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६४२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,११,६३८ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. लॉकडाऊनच्या या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२७९ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५३,०७१ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३ आणि पुणे येथील १ अशा ४ पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. ४२ पोलीस अधिकारी व ४१४ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
'सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे'
राज्यात एकूण ४८०८ हजार रिलिफ कँम्प आहेत. तर जवळपास ४,४२,२९८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉकडाऊन मध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लॉकडाऊन संपले असे नाही. उलट या काळात सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.