Good News : राज्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह आशा वर्कर्ससाठी प्रोत्साहन भत्ता
महाराष्ट्रातील सुमारे पावणेतीन लाख ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर्ससाठी खूशखबर आहे.
मुंबई : राज्यातील सुमारे पावणेतीन लाख ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर्ससाठी खूशखबर आहे. कोरोना प्रतिबंधासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनाबरोबरच एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली आहे. तसेच जोखीम पत्करून कोरोनाविरोधात लढणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांना २५ लाख रुपयांचं विमा संरक्षणही मिळणार आहे. याबाबत सर्व जिल्हा परिषदांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणालेत.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याचं वेतन कापले जाणार नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं वेतन २ टप्प्यांत देण्यात येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय दुपारी सरकारने जाहीर घेतला होता. मात्र विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.
ठळक बाबी -
- ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्ससाठी खूशखबर
- कोरोना प्रतिबंधासाठी काम करणार्या कर्मचार्यांना प्रोत्साहनपर रक्कम
- एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्णय
- नियमीत वेतनाव्यतिरिक्त मिळणार ही प्रोत्साहनपर रक्कम
- या कर्मचाऱ्यांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षणही मिळणार
- सर्व जिल्हा परिषदांना कार्यवाहीसाठी सूचना
- जोखीम पत्करुन कोरोना विरोधात लढा देणाऱ्यांनाही मिळणार भत्ता
- ग्रामीण भागातील २ लाख ७३ हजार कर्मचाऱ्यांना ही प्रोत्साहनपर रक्कम
- या कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षण दिलं जाणार