मुंबई : कोरोनाविरुद्ध लढा सुरुच आहे. राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात शुक्रवारी १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६२ हजार ७७३ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाच्या ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खासगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४  नमुन्यांपैकी  १ लाख २४ हजार ३३१  नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत, असे ते म्हणालेत.


सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख  ९१ हजार  ४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे.



 शुक्रवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-१२४ (मुंबई ११४, ठाणे २, वसई-विरार ५, रायगड ३), नाशिक-९ (नाशिक, धुळे, जळगाव प्रत्येकी ३), पुणे-१ (सोलापूर १), औरंगाबाद-८ (औरंगाबाद ८). तर नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८९ पुरुष तर ५३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १४२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७४ रुग्ण आहेत तर ५७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५८९३ झाली आहे.