मुंबई : शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई आतापर्यंत एकूण १६२ रुग्ण आढळले असून त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या ५ हजाराहून अधिक व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याने आरोग्य क्षेत्रातल्या सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई ५ सरकारी रुग्णालये आणि संस्था आणि ७ खासगी लॅबच्या माध्यमातून दिवसाला २ हजार नमुन्यांची सुविधा उपलब्ध असल्याचे टोपे यांनी सांगितले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट रूग्णालयातील ईमर्जन्सी सेवा वगळता ओपीडीसह इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येवून रूग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच क्वारंटाईन असलेले कर्मचारीही कामावर येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी रुग्णालयास भेट देवून ओपीडीसह इतर सेवा बंद करण्यास सांगितले आहे.



महाराष्ट्र राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे अठरा रुग्ण सापडले, त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३२० वर गेला आहे. १८ रुग्णांपैकी सोळा रुग्ण मुंबईत सापडले आहेत. तर दोन रुग्ण पुण्यात सापडले आहेत. दरम्यान, वरळीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्यामुळं आणि काही जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे कोळीवाडा आणि आदर्शनगरमधील ८६ जणांना पोद्दार आयुर्वेदिक रूग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच या संख्येत आणखी वाढ होवून २०० पर्यंत जावू शकतो.


वरळीचे स्थानिक आमदार आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळीकरांना संदेश दिला आहे.थोडा त्रास होत आहे, त्याबद्दल माफी मागतो. परंतु जीव वाचवण्यासाठी हा त्रास सहन करावा लागेल. कोरोनाचा वरळीत धोका वाढत असल्याने घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. धारावीतील कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने धोका अधिक वाढला आहे.सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना धारावीतील कोरोना बाधिताचा मृत्यू झाला.