कृष्णात पाटील, मुंबई  : मुंबईत यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट दिसून येतंय. राज्य सरकारने अद्यापही गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात कुठलीच नियमावली जाहीर केली नसल्यानं मागील वर्षीचा गोंधळ यावर्षीही कायम राहिला आहे. गणेशमूर्तींची उंची किती असावी यासह अनेक प्रश्न गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तीकारांना पडलेत, ज्यामुळं संभ्रम वाढत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळा सुरु झाला की मुंबईतल्या या लालबाग परळ भागात गणेश मूर्तीकारांची लगबग पहायला मिळते. मूर्तीकारांच्या कारखान्यात गणेशमूर्ती ठरवण्यासाठी गणेश मंडळांची रिग लागलेली असते. पण मागील वर्षीप्रमाणेच यंदा कोरोनामुळं हे चित्र इथं पहायला मिळत नाहीय. दुसरीकडं लहान मूर्ती बनवणा-यांनी मात्र आपले काम सुरू ठेवलेले आहे. 


यंदा कोरोनाचे संकट कायम तर आहेच शिवाय आता तिस-या लाटेची शक्यताही वर्तवली जात असल्यानं गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळं दरवर्षी मुंबईत धुमधडाक्यात साजरा होणा-या गणेशोत्सवाला यंदाही कोरोनाचे ग्रहण कायम आहे. 


मागील वर्षी राज्य सरकारने गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात खूप उशीर केला होता.यंदाही यासंदर्भात काहीच नियमावली तर सोडा काही संकेतही दिलेले नाहीत. परिणामी गणेशमुर्तींची उंची किती असावी, उत्सव कसा साजरा करावा यासह कुठल्याचा प्रश्नांचा उलगडा सरकारकडून होत नाहीय. 


मागील वर्षी गणेशमुर्तींच्या उंचीवर निर्बंध आणल्यानं मुर्तीकारांना प्रचंड आर्थिक झळ सोसावी लागली होती. त्यामुळं किमान यंदा तरी गणेशमुर्तींच्या उंचीचे बंधन ठेवू नये, अशी मागणी मुर्तीकार करतायत.


मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसंच आता लसीकरणाचा वेगही वाढत आहे. त्यामुळं यंदा गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध लादू नयेत, असं सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे म्हणणं आहे. तसंच गणेश मंडळातील सदस्यांचे प्राधान्याने लसीकरण करून लवकर नियमावली जाहीर करण्याची त्यांनी मागणी केलीय.