मुंबई : कोरोनाचे वाढते संकट (Corona crisis) पाहता मुंबईत (Mumbai) पुन्हा सरकारने नाईट कर्फ्यू (night curfew) लागू केला आहे. काल रात्रीपासून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. ५ जानेवारीपर्यंत हा कर्फ्यू लागू असेल. रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत कडकडीत कर्फ्यू असेल. एकीकडे कोरोनाचे ( Coronavirus) संकट वाढत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे युरोपात पसरत असलेल्या कोरोनाच्या ( Coronavirus) नव्या स्ट्रेनची भीती आहे. त्यातच नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये नागरिक आहेत. त्यामुळे कोणत्याही स्थितीत कोरोनाचा फैलाव पुन्हा होऊ नये म्हणून उत्साहाला आळा घालण्यासाठीच नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पोलिसांनी काल रात्रीपासून मुंबईत अनेक भागात नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करत कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली. 


ठाण्यातही नाकाबंदी


ठाणे पोलिसांकडून कडक नाकाबंदी करण्यात येत आहे. पोलिसांकडून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येतेय. यात दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात येतेय. ख्रिसमस आणि न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय.  अत्यावश्यक सेवा, दूध-भाजीपाला वगळता इतर आस्थापने ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६पर्यंत बंद असणार आहेत. ठाणेकरांनी या कारवाईचं स्वागत केले आहे. 


कल्याणात संचारबंदी लागू


काल रात्रीपासून कल्याणात संचारबंदी लागू झाली. या पार्श्वभूमीवर नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली. महात्मा फुले आणि बाजारपेठ पोलिसांकडून कल्याण स्टेशन परिसरात मास्क न घालणाऱ्या, विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर बैलबाजार परिसरात करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान मास्क न घालता गाडी चालवणाऱ्या चालकांवरही यावेळी कायदेशीर कारवाई  करण्यात आली. 


पुढील ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी आदेश असून अत्यावश्यक काम असल्याशिवाय रात्री ११ ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान लोकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन एसीपी अनिल पोवार यांनी केले. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.