मुंबई : देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती भयावह झाली आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ही दिवसें दिवस वाढत आहे. अशात मुंबईसाठी एक अतिशय सकारात्मक बातमी समोर आली आहे. या बातमीमागे कारण आहे, ते मुंबईकरांनी मास्क आणि सॅनिटाईज करण्याचे आणि घरात बसण्याचे नियम मोठ्या प्रमाणात पाळले आहेत. याचे रिझल्टलयायला सुरुवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंदाची बातमी म्हणजे कोरोना टेस्ट पॉझिटिव्हनेस रेट (TPR) 10 टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचे आढळले आहे. बऱ्याच दिवसानंतर, बीएमसीने केलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह लोकांची टक्केवारी सिंगल डिजिटवर आली आहे. याला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, प्रत्येक 100 लोकांमध्ये 10 पेक्षा कमी लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. 29 एप्रिल रोजी 43 हजार 525 लोकांची कोरोना टेस्ट झाली. त्यापैकी केवळ 4 हजार 328 लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.


यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी सांगितले की, "44 हजार लोकांची चाचणी घेण्यात आल्यानंतर आमचा (मुंबईचा) पॉझिटिव्ह रेट सिंगल डिजिटवर आला आहे. बहुधा मुंबई हे भारतातील एकमेव असे शहर आहे, ज्यात अत्यधिक चाचणी करूनही सिंगल डिजिटवर पॉझिटिव्ह रेट आहे." आणखी एक चांगली गोष्ट अशी आहे की, मुंबईत नोंदवल्या गेलेल्या पॉझिटिव्ह केसेस मधील 85 टक्के केसमध्ये कमी लक्षणे दिसली आहेत.


आयुक्त चहल म्हणाले की, "शुक्रवारी मुंबईत रिकाम्या बेडची संख्याही वाढून 5 हजार 725 झाली आहे, म्हणजे रूग्णालयात दाखल झालेल्यांची संख्याही कमी झाली आहे. याचा अर्थ असा आहे की, लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. लोक आजारी कमी पडत आहेत."


19 एप्रिलपासून 20% पेक्षा कमी झाले पॉझिटिव्हचे प्रमाण  


मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी गेल्या वर्षी कोरोना कालावधीच्या सुरूवातीलाच महापालिकेची सूत्रे हाती घेतले. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलच्या सुरूवातीला टेस्ट पॉझिटिव्हनेस रेट (TPR)  20.85 टक्के होता. सर्वाधिक पॉझिटिव्ह रेट 4 एप्रिल रोजी समोर आला. या दिवशी 51 हजार 313 लोकांची चाचणी घेण्यात आली, त्यात 11 हजार 573 लोकं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. जर आपण आकडेवारीकडे पाहिले तर 19 एप्रिलपासून पॉझिटिव्ह रेट 20% पेक्षा कमी होऊ लागला आहे.


खरोखर ही एक चांगली बातमी आहे का?


या आठवड्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारच्या कोविड 19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, मुंबई लवकरच कोविडविरूद्धच्या लढाईत यशस्वी होईल. पण इक्बालसिंग चहल यांनी दिलेली आकडेवारी अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. पहिला प्रश्न असा आहे की, 19 एप्रिलपासून पॉझिटिव्ह दर खाली येऊ लागला आणि आज तो 20 टक्क्यांवरून खाली आला आणि सिंगल डिजीट झाला आहे. परंतु हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, 19 एप्रिलनंतर चाचणीची संख्याही  50 हजारांचा टप्पा ओलांडू शकली नाही.


3 एप्रिल रोजी 51 हजार 319 चाचण्या घेण्यात आल्या. 6 एप्रिल रोजी 51 हजार 263 चाचण्या घेण्यात आल्या. 8 एप्रिल रोजी 55 हजार 741 चाचण्या घेण्यात आल्या. 10 एप्रिल रोजी 52 हजार 159 चाचण्या घेण्यात आल्या. 13 एप्रिल रोजी 56 हजार 226 चाचण्या घेण्यात आल्या. 15 एप्रिल रोजी अखेरच्या वेळी 50 हजार 533 चाचण्या घेण्यात आल्या. यानंतर चाचणीची संख्या 50 हजारांवरही पोहोचू शकली नाही. जेव्हा टेस्टींग रेट कमी केला गेला आहे, तर साहजिकच पॉझिटिव्ह रेटमध्ये घट झाली आहे.


देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न अजूनही कायम


यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनीही एक मोठा प्रश्न उपस्थित केला की, मुंबईची लोकसंख्या नागपूर आणि पुण्यापेक्षा तीन ते चार पट जास्त आहे. परंतु चाचणी अजून वाढलेली नाही. नागपूर-पुणे येथे दररोज 21 हजार ते 28 हजार टेस्ट घेण्यात येत आहे, तर मुंबईत 19 एप्रिलपासून फक्त 28 हजार ते 47 हजार टेस्ट घेण्यात आल्या आहेत. दररोज मुंबईत किमान 75 हजार चाचण्या व्हायला हव्यात आहेत. तरच आपल्याला वस्तुस्थिती कळेल. अन्यथा, आकडेवारीची स्थिती बदलणार नाही.