`जबाबदारी झटकून पळ काढू नका`, वांद्र्याच्या गर्दीवरून फडणवीसांचं आदित्यना प्रत्युत्तर
कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्येही मुंबईच्या वांद्रे स्टेशनवर हजारो मजुरांनी गर्दी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्येही मुंबईच्या वांद्रे स्टेशनवर हजारो मजुरांनी गर्दी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. वांद्रे स्टेशनवर झालेल्या या गर्दीचं खापर आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर फोडलं. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
'वांद्र्यामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणं ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारं आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणं, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणं, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. तशी व्यवस्था होत नसल्याचं आम्ही अनेक दिवसांपासून निदर्शनास आणून देत आहोत, तरीही राज्य सरकारने तसे उपाय केले नाहीत. आजच्या घटनेतून राज्य सरकारने धडा घ्यावा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
'अशा स्थितीमध्येही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल, तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरुद्धचा लढा हा राजकीय नाही, हे आतातरी लक्षात घ्या. हा लढा गांभीर्यानेच लढावा लागेल,' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
'केंद्र सरकारने कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे वांद्रे स्टेशनबाहेर अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरतमध्ये झालेली दंगलही याचाच परिणाम आहे. या कामगारांना अन्न किंवा घर नकोय, त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे,' असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.
'ज्या दिवसापासून ट्रेन बंद झाल्या तेव्हापासून आणखी २४ तासांसाठी ट्रेनसेवा सुरू ठेवावी, ज्यामुळे परराज्यातले कामगार त्यांच्या घरी परत जातील, अशी विनंती आम्ही केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही हा मुद्दा उपस्थित केला होता. परराज्यातल्या कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची विनंती उद्धव ठाकरेंनी मोदींना केली होती,' असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.