मुंबई : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. यावर लस शोधण्यास संशोधकांना यश आले नाही. यासाठी आणखी काही कालावधी जाऊ शकतो. तोपर्यंत खबरदारी हाच उपाय मानला जातोय. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. आरोग्य कर्मचारी वापरत असलेल्या पीपीई कीट आणि एन-९५ मास्कवरील कोरोना विषाणू नष्ट होणं हे आव्हानं होतं. पण यावर दिलासादायक बातमी समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ.विश्वनाथ पाटील आणि स्वच्छ उर्जा अलाएन्सचे डॉ. सुनील पेशणे आणि त्यांचा विद्यार्थी रोशन राणे यांनी एकत्र येऊन मोठी कामगीरी केली आहे. यामुळे कोरोना वॉरीअर्सचा जीव वाचू शकणार आहे. कोरोना वॉरिअर्स वापरत असलेले पीपीई कीट आणि एन-९५ मास्कवर जमा होणारे कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारीत अँटीव्हायरल कोटींग्स तयार करण्यात आली आहेत. विशिष्ट प्रकारच्या पॉलिमर्समध्ये नॅनो पार्टीकल्स बनवून त्याची कोटींग तयार करण्यात आली आहेत. याचा फायदा कोरोना वॉरिअर्सना होणार आहे.
 
विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या या अँटीव्हायरल कोटींग्सची पीपीई कीट आणि एन-९५ मास्कच्या पॉलिमर्सवर याची प्राथमिक चाचणी सुद्धा करण्यात आली आहे. या कोटींग्सची कोरोना विषाणूंना मारण्याची क्षमता यावर लवकरात लवकर चाचण्या घेण्यात याव्यात यासाठी दोन्ही संशोधक प्रयत्नशील आहेत. देशातील एकमेव बीएसल ३/४ पातळीच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरालॉजी ( National Institute of Virology) पुणे येथे ही कोटींग्स तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे हा प्रकल्प डीएसटीला नुकताच सादर करण्यात आला आहे.



'कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचावात्मक उपाययोजना करण्यासाठी आणि या संकटकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याच शैक्षणिक उपक्रमातील हा एक टप्पा आहे. शैक्षणिक क्षेत्रातून जेवढी भरीव मदत करता येईल त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.