मुंबई :   मुंबईतील केईएम रुग्णालयातून एक ७० वर्षीय रुग्ण हरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी याबाबत आवाज उठवत या प्रकाराला जबाबदार कोण ? असा सवाल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमैया यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील लालबागच्या जीजामाता नगरमध्ये राहणारे ७० वर्षांचे रुग्ण कोरोनासदृश लक्षणं असल्याने १४ मे रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. १८ मे रोजी त्यांची अचानक तब्बेत खालावल्यामुळे त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. १९ मे रोजी सकाळी रुग्णालयातून रुग्ण हरवला असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. रुग्ण वॉर्डमधून हरवल्याचे नातेवाईकांना कळवण्यात आले.


त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २१ मे रोजी एक मृतदेह दाखवत तो संबंधित रुग्णाचा असल्याचे सांगितले. पण तो आपल्या रुग्णाचा मृतदेह नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर १० दिवस झाले तरी आजपर्यंत त्या रुग्णाचा शोध सुरु आहे. पण ते कुठे आहेत हे कुणालाच माहीत नाही, असे सोमैया यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


एकीकडे कोरोनाबाधितांना उपचार कसे मिळणार याची चिंता असतानाच दुसरीकडे आता रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हेंटिलेटरवर असलेला रुग्ण पळून तर जाऊ शकत नाही. त्यामुळे रुग्ण कसा काय हरवला आणि या प्रकाराला जबाबदार कोण ? असा प्रश्न किरीट सोमैया यांनी विचारला आहे.


याबाबत केईएम रुग्णालयाकडून अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही.



दरम्यान, केईएमच्या प्रत्येक कोविड वॉर्डमध्ये डॉक्टरांची १०० टक्के उपस्थिती असली तरी नर्सची उपस्थिती मात्र ५० टक्के तर वॉर्डबॉयची हजेरी केवळ ३३ टक्के इतकीच आहे. केईएम रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात गैरहजर राहत असून त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे समजते.