मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी तैनात महिला पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने मुंबई रेड झोनमध्ये आहे. आता एक धक्कादायक बातमी आहे.
दीपक भातुसे / मुंबई : कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने मुंबई रेड झोनमध्ये आहे. आता एक धक्कादायक बातमी आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तैनात महिला पोलीस अधिकारी कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या घराजवळील एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाली होती.
मुंबईत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. धारावी आणि वरळी ही ठिकाणे हॉटस्पॉट ठरली आहेत. आता कोरोनाचा शिरकार मुख्यमंत्री यांच्या सरकारी बंगला वर्षापर्यंत शिरकाव झाला आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. संबंधित महिला पोलीस अधिकारी वर्षा बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात होत्या. दोनच दिवसांपूर्वी त्यांची इथे ड्युटी लावण्यात आली होती.
दरम्यान, प्रवेशद्वाराजवळ तैनात पोलिसांचे शारीरिक तापमान तपासताना या महिला पोलीस अधिकाऱ्यांचे तापमान जास्त आढळले. त्यामुळे त्यांना कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला, चाचणीनंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्या आधी संबंधित महिला पोलीस अधिकारी पायधुनी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. पायधुनी पोलीस ठाण्यात त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीसांना क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.