सावधान! मुंबईत कोरोनाचा विळखा वाढतोय, आज कोरोनाबाधितांची संख्या जास्त
गेल्या चोवीस तासात कोरोनामुक्तांपेक्षा बाधितांची संख्या जास्त नोंदवण्यात आली आहे
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या (Corona in Mumbai) गेले काही दिवस कमी असताना आज एकदम पाचशेच्यावर उसळी घेतली आहे. मुंबईत (Mumbai) आज 530 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 4 जणांचा मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासात 349 रुग्ण बरे होऊन घरी गेले.
गेल्या काही दिवसात मुंबईत कोरोना रुग्णसंख्या 200 पर्यंत खाली घसरली होती. पण आता दररोजच्या रुग्णसंख्येत 300 ने वाढ झाली आहे. गेले चार दिवस रुग्णसंख्या चारशेच्या पुढे आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी 441, शुक्रवारी 422, शनिवारी 416 आणि रविवारी 496 रुग्ण आढळले.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सवाला काही तासच शिल्लक असल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे तिसरा लॉकडाऊन नको असेल तर प्रत्येकाने सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्के इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1 हजार 253 दिवसांवर गेला आहे. सध्या मुंबईत 3 हजार 895 सक्रिय रुग्ण आहेत.