अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्याचे कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांची विस्तृत मुलाखत घेतली. झी २४ तासच्या प्रश्नांना डॉक्टर संजय ओक यांनी काय उत्तरं दिली पाहा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णांना खाजगी रुग्णालयात जागा मिळणे कठीण झाले आहे का?


- सरकारी रुग्णालयात बेडस् वाढवले आहेत. खाजगी  रुग्णालयात जागा वाढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेजेच्या प्रांगणात सिमेंट काँक्रीट जागेच्या ठिकाणी ५०० बेडस् चे आयसीयू तयार करण्याचा प्लॅन आहे. मुंबईत रियल टाइम डॅशबोर्ड तयार करण्याचे काम पूर्णत्वास जात आहे. आलेलं संकट मोठं आहे तेव्हा थोडी त्रेधातिरपीट उडत आहे हे खरं आहे. 


खाजगी हॉस्पिटलमध्ये अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात आहेत


- या संदर्भात मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत ही बिलं सुद्धा चर्चिली गेली. यापुढे खाजगी रुग्णालयात ८० टक्के बेडस् या कोविड आणि नॉन-कोविड यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला, याचा दर हा सरकारी असेल. २० टक्के बेडस् हे खाजगी रुग्णालयाच्या ताब्यात असतील, त्याचा दर खाजगी रुग्णालये आकारातील. बेडस् किती उपलब्ध आहेत याबद्दल फलक रुग्णालयाबाहेर लावला जाईल. 


कोरोना टेस्टचा दर हा जास्त का आहे?


- खर्च जास्त आहे मान्य, पण जर टेस्ट करणाऱ्या लॅबची संख्या वाढवली तर दर कमी होईल, पुढील काही दिवसांत हा दर 2500 रुपये एवढा खाली येईल असं वाटतं.


नेमकी कोणती औषधे सरकारने सांगितली आहेत?


चार औषधांची मागणी आम्ही टास्क फोर्सने सरकारकडे केली आहे. काही उपलब्ध आहेत, काही अत्यंत कमी स्वरूपात. याचा पाठपुरावा चालू आहे.


प्लाझ्मा थेरपीचा निकाल काय आहे?


- अजून खूप पल्ला गाठावा लागेल, प्रयोग सुरू आहेत, काही ठिकाणी यश आलं आहे, काही ठिकाणी तेवढं यश आलेले नाही.


पावसाळा जवळ आला आहे, आजाराचा स्फोट होईल असं वाटत का?


आजाराच्या या साथीमध्ये parabolic curve असतो त्याच्या एका टोकाच्या जवळ आपण होतो. आता आपण आणखी पुढे सरकलो आहोत. मात्र बरे होण्याचे प्रमाणही मोठं आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. बरे झालेल्या रुग्णाला त्याच्या घराच्या आसपासशी लोकं घेत नाहीयेत.


कोविडबाबत साक्षरता आलेली नाही?


- अजून तेवढी नाहीये. सातव्या दिवसानंतर रुग्णांवरील कोविड क्षीण झालेला असतो. अशा गोष्टी लोकांना माहिती नाहीयेत. रुग्णाकडून रोगाचा प्रचार होण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले असते.


एकच टेस्ट करायचा निर्णय झाला, त्यानंतर सोडायचं, यामुळे भीती निर्माण झाली आहे?


- पहिली टेस्ट पोसिटीव्ह आल्यावर जर पुन्हा लक्षणे दिसली तरच पुढे टेस्ट करण्याची किंवा विलीगिकरण करण्याची आवश्यकता आहे.


रुग्णांचा आकडा काही कमी होत नाहीये, याचं कारण काय?


- कोविडचा आकडा वाढत आहे हे सत्य आहे, मात्र हा आकडा विस्फोटक नाहीये. इटली -स्पेनमध्ये जसं झालं तसं इथे झालं नाही. कारण आपण आरोग्य यंत्रणेने तसं काम केलं.