कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं (Corona) संकट वाढू लागलं आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत गेल्या तीन ते चार दिवसात वाढ होताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या हजारपार गेली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 1045 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आज 517 रुग्ण बरे होऊन घरी गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णसंख्येत दुपटीने वाढ
राज्यात गेल्या दीड महिन्यात सातपटीने आणि गेल्या दोन दिवसांत दुप्पटीने कोरोना रूग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी आज तातडीने कोवीडविषय राज्य टास्क फोर्सची (Task Force) बैठक बोलावली. या बैठकीत मास्क सक्तीसह इतर निर्बंध लावण्याच्या मनस्थितीत राज्य सरकार आणि राज्य कोवीड टास्क फोर्स नसली तरी लोकांना घराबाहेर पडताना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आलं.
 
येता आठवडा अत्यंत महत्वाचा असून या काळात जर रूग्णसंख्या वाढतच राहिली, रूग्णालयात रूग्ण दाखल करण्याचे प्रमाण वाढले, ऑक्सीजन गरज जास्त भासू लागली तर मात्र राज्य सरकार निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. जरी पूर्ण लॉकडाऊन लावला जाणार नसला तरी मिनी लॉकडाऊन मात्र लागू शकतो.


राज्यभरात शाळा सुरु होणार
येत्या 13 जूनपासून राज्यभरातील शाळाही आता सुरू होत आहेत. त्यात अजून 12 ते 18 वयोगटातील सर्व मुलांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही. कारण कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर पालकांनी या वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी टाळाटाळ केलीय. तसंच 12 वर्षांखालील मुलांना तर लसीचं अजून कवचही उपलब्ध झालेलं नाही. 


त्यामुळं रूग्णसंख्या वाढत असताना कदाचित शाळा सुरूही होतील. पण पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतील का,खरा प्रश्न आहे. त्यामुळं 12 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण पूर्ण करणे आणि शाळेमध्ये कोवीडविषयक नियमांचे पालन करणे येत्या काळात गरजेचे राहणार आहे.


कोरोनाची लक्षणं काय?
सध्या रूग्णवाढीचा वेग जास्त असला तरी मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे आणि रूग्ण रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी आहे. सध्या  ताप, घसा खवखवणे आणि आवाज बदलणे ही कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळं यावर लक्षणांनुसार उपचार करणे गरेजेचे असल्याचं मत टास्क फोर्सने व्यक्त केलंय. 


पूर्वीप्रमाणे या कोवीड संकटातही 60 वर्षांवरील व्यक्ती आणि कोमॉर्बिड रूग्णांची काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत कोवीड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ संजय ओक यांनी सांगितलं आहे.


सक्रिय रुग्णसंख्याही वाढतेय
16 एप्रिल 2022 रोजी राज्यात सर्वात कमी म्हणजे 626 सक्रिय रुग्ण होते. यात दीड महिन्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या ४५०० वर गेली आहे. तसंच मुंबई, ठाणे, पुणे तसंच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर 7 टक्के असून राज्याचा देखील वाढून 3 टक्के झाला आहे.


कोरोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात?
त्यामुळं ही चौथ्या लाटेची सुरूवात तर नाही ना, अशी शंका उपस्थित करण्यास नक्कीच वाव आहे. कोविड चाचण्यांचे कमी झालेलं प्रमाण वाढवणं आणि कोरोना संकट कमी झालं म्हणून बूस्टर डोस घेण्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं होतं.  पण आता दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोना संकट पुन्हा उंबरठ्यावर येवून ठेपलंय, ज्याला परत एकदा प्रत्येकाने आपल्या स्वयंशिस्तीने हरवण्याची गरज आहे.