Corona : गर्दी टाळण्यासाठी मुंबईत आणखी भाजी विक्री केंद्र सुरू होणार
आणखी भाजी विक्री केंद्रासाठी अटी
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईत अतिरिक्त भाजी विक्री केंद्र सुरू होणार आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली, या बैठकीत भाजी विक्री केंद्रांना परवानगी देण्यात आली. भाजी विक्री केंद्रांना परवानगी देण्यात आली असली तरी यासाठी काही अटी आणि नियम ठेवण्यात आले आहेत.
अतिरिक्त भाजी विक्री केंद्रांमध्ये दोन भाजी विक्रेत्यांमधील अंतर हे किमान २० फूट असावे. तसंच दोन ग्राहकांमध्ये किमान साडेतीन फूट (१ मीटर) एवढे अंतर ठेवणं बंधनकारक असणार आहे. या नियमांमुळे भाजी विक्री केंद्रासाठी पुरेशी जागा असेल तरच भाजी आणि फळं विकण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये भाजी आणि फळं विकत घेण्यासाठी नागरिक महापालिकेच्या मंडईत एकाच परिसरात ठराविक वेळात गर्दी करतात. ही गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने अतिरिक्त भाजी विक्री केंद्रांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. नियम पाळले नाहीत तर ही तात्पुरती दुकानं तात्काळ बंद करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.
या आदेशाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करणे आणि त्यासाठी पोलिसांचे सहकार्य घेणे या सगळ्याचं नियोजन आणि व्यवस्थापन विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावरून करण्यात येणार आहे.