कोरोनाचा फटका भारतीय रेल्वेला, मुंबईतून सुटणारी तेजस ट्रेन महिनाभरासाठी बंद
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गामुळे रेल्वेच्या गाड्यांना फटका बसला असून भारतीय रेल्वेने या तेजस एक्स्प्रेसची सेवा एक महिन्यासाठी बंद केली आहे.
मुंबई : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गामुळे रेल्वेच्या गाड्यांना फटका बसला असून भारतीय रेल्वेने मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान तेजस एक्स्प्रेसची सेवा एक महिन्यासाठी बंद केली आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोविडच्या (covid-19) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-अमहादाबाद दरम्यान धावणारी तेजस ट्रेन (82902/82901) दोन एप्रिल ते पुढच्या एका महिन्यात बंद करण्यात आली आहे. ( Mumbai-Ahmedabad Tejas train closed for a month)
रेल्वे परत करणार प्रवाशांचे पैसे
रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, ज्यांनी तेजस एक्स्प्रेसचे (Tejas Express) तिकीट आरक्षण केली आहेत ती आता रद्द करण्यात आली आहेत. याबाबत प्रवाशांना माहिती देण्यात आली असून त्यांचे पैसे परत केले जातील. गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर भारतीय रेल्वेने सर्व गाड्या रद्द केल्या आणि तेजस ट्रेन ऑक्टोबरपर्यंत बंद राहिली. मुंबई-अहमदाबाद तेजस रेल्वे ऑक्टोबरमध्ये पुन्हा सुरु करण्यात आली होती, परंतु प्रवासी कमी असल्याने नोव्हेंबरमध्ये ही गाडी पुन्हा बंद करण्यात आली. त्यानंतर यावर्षी 14 फेब्रुवारी रोजी ही गाडी सुरु करण्यात आली होती.
महाराष्ट्रात 24 तासांत 43183 कोरोनाचे रुग्ण
कोरोना विषाणूचा सर्वाधिक फैलाव हा महाराष्ट्रात होत आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी मागील 24 तासात राज्यात 43183 नवीन रुग्ण आढळले, तर 249 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, एकूण कोरोना रुग्णाची संख्या 28,56,163 वर पोहोचली आहे. तसेच 54898 लोकांचे मृत्यू झाला आहे. राज्यात कोविड-19 पासून आतापर्यंत 24,33,368 लोक बरे झाले आहेत आणि 3,66,533 संक्रमित झाले आहेत..