Omicron ने वाढवलं महाराष्ट्राचं टेन्शन, लॉकडाऊनने होणार नव्या वर्षाची सुरुवात?
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे
Omicron Variant News : ओमायक्रॉनमुळे (Omicron) महाराष्ट्राचं (Maharashtra) टेन्शन पुन्हा एकदा वाढलंय. राज्यावर पुन्हा एकदा लॉकडाऊनचं (Lockdown) संकट घोंगावू लागलं आहे. रूग्णवाढीचा वेग पाहता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहेत
महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona Third Wave) उंबरठ्यावर आहे. राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या 2 हजारांच्या पुढे गेलीये. त्यामुळे दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही कडक निर्बंध लावले जाऊ शकतात. तसे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
राज्यात दिल्लीप्रमाणे कडक निर्बंध?
जर दिल्लीप्रमाणे राज्यातही कडक निर्बंध लागू झाले तर रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू (night curfew) असेल. शाळा, महाविद्यालय बंद राहतील. थिएटर्स, मल्टिप्लेक्स, बँक्वेट हॉल, स्पा, जिम आणि मनोरंजन पार्क बंद राहतील. दुकानं सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सम-विषम तत्त्वावर उघडतील. आठवडी बाजार एका झोनमध्ये फक्त एकच उघडेल, ज्यामध्ये फक्त 50% दुकानदारांना परवानगी दिली जाईल. मेट्रो आणि बसेस 50% क्षमतेनं धावतील.
रेस्टॉरंट्स 50% क्षमतेसह सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत उघडी असतील. धार्मिक स्थळांवर भाविकांना पुन्हा प्रवेशबंदी होईल. सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांवर बंदी असेल.
टास्क फोर्सनेही व्यक्त केली चिंता
टास्क फोर्सचे (Task Force) सदस्य डॉ. शशांक जोशी (Dr Shashank Joshi) यांनीही आकडेवारी गंभीर असल्याचं ट्विट केलंय. तिसऱ्या लाटेत केवळ चार दिवसातच रूग्णांची संख्या दुप्पट होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलंय.
पहिल्या लाटेत 12 दिवसांत 706 कोरोना रूग्णांची संख्या दुप्पट म्हणजेच जवळपास 1367 इतकी झाली होती. दुसऱ्या लाटेत 683 ते 1325 रूग्ण होण्यासाठी 20 दिवस लागले. मात्र तिसऱ्या लाटेत अवघ्या 4 दिवसांतच 683 रूग्णसंख्या 1 हजार 377 वर जाऊन पोहचल्याचं डॉ जोशी यांनी म्हटलंय.
त्यामुळे तिस-या लाटेला हलक्यात घेऊ नका. न्यू इअरचं सेलिब्रेशन करताना काळजी घ्या.. तुमची एक छोटीशी चूकही महागात पडू शकते.