मुंबई : मुंबईत कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी कस्तुरबा हॉस्पिटलसह राजावाडी, वांद्रे भाभा रुग्णालय, कुर्ला भाभा रुग्णालय आणि जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातही विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढल्यास त्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या उपाययोजना महापालिकेने सुरू केल्या आहेत. मुंबईत आढळलेल्या कोरोना संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवलं जातं. येथे सध्या २८ खाटांची सुविधा उपलब्ध आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत हा एकमेव देश आहे जिथे कोरोनाचा विशेष प्रादुर्भाव झालेला नाही. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्रात एक मुंबई, एक पुण्यात असे दोन संशयित आहेत, आज त्यांचे अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. सर्वांनी काळजी घ्यावी. राज्य सरकार योग्य ती काळजी घेत आहे, तयारी व्यवस्थित सुरु असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं, आवहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. 


जगभरात कोरोना वायरसचं थैमान वाढतच आहे. दरम्यान नवी दिल्ली येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. याशिवाय तेलंगणामध्ये देखील एक प्रकरण समोर आलं आहे. दिल्लीत आढळलेला कोरोनाचा रुग्ण इटलीहून आला होता. दुसरा इसम दुबईतून आला होता. या रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येत असून दोघांची तब्येत ठिक असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आलं. 


कोरोना व्हायरसमुळे भारताच्या आरोग्य मंत्रालयाने इटली, ईराण, साऊथ कोरिआ आणि जपानहून येणाऱ्या प्रवशांचा व्हिजा रद्द केला आहे. ३ मार्चनंतर या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना भारताचा व्हिजा नाकारण्यात आला आहे.