मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. राज्यातल्या १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेत. औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. या महिलेला धुत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही महिला रशियातील कझागिस्तानमधून आली होती. या घटनेनंतर आता राज्यातील कोरोनाबिधित रुग्णांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. देशात सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. काल रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये ५ आणि औरंगाबादमध्ये १ रुग्ण आढळून आला. संध्याकाळी पुण्यात आणखी एका रुग्णाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय एकूण ९५ संशयित रुग्णांना राज्यातल्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा संसर्गजन्य रोग असला तरी रोग प्रतिकार क्षमतेच्या जोरावर तो रोखता येऊ शकतो. त्यासाठी शासनाने, डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.



राज्यातल्या प्रमुख शहरांच्या व्यतिरीक्त औरंगाबाद, धुळे, मिरज आणि सोलापुरातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही लवकरच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची चाचणी सुरू होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात कोरोना चाचणी करण्यासाठी उपलब्ध सुविधांची क्षमता वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


सर्वात जास्त १६ रुग्ण पुण्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई, नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळलेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, कामोठे, औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय. तर यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झालीय. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं राज्य सरकारची आणि आरोग्य विभागाची चिंता वाढलीय. करोनाग्रस्त रुग्णांचा खर्च राज्य सरकारच करणार आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.