कोरोनाग्रस्ताची रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या
मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे.
मुंबई : देशभरासह राज्यातही कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच एका कोरोनाग्रस्ताने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मुंबईतील नायर रुग्णालयात 29 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेने आत्महत्या केली आहे. रुग्णालयातील बाथरुममध्येच महिलेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील अधिक तपास सुरु आहे.
जनतेनंतर आता डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचं चित्र आहे. जसलोक, भाटिया, बॉम्बे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य सरकार, पालिकेकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईतील अनेक भागात हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये झोपडपट्टीचाही समावेश आहे. मात्र मुंबईसारख्या शहरांत दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या मोठी चिंतेची बाब ठरतेय.
देशात सर्वाधित कोरोना रुग्ण महाष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या २६८४वर पोहचली आहे. तर त्यापैकी एकट्या मुंबईतच १७५६ इतके कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत ११२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झााल आहे.