कल्याण: मुंबईपाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सोमवारी या भागात कोरोनाचे आणखी सहा नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये डोंबिवली पश्चिम येथील चार तर कल्याण पश्चिममधील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलितील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३४ वर जाऊन पोहोचला आहे. यामुळे शहरातील नागरिक सध्या प्रचंड धास्तावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Coronavirus: ही लढाई दीर्घकाळ चालणार आहे, थकून चालणार नाही- मोदी

दरम्यान, राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सोमवारी ७८८ वर जाऊन पोहोचला. तर आज दिवसभरात आणखी तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये सातारा, अंबरनाथ आणि नालासोपाऱ्यातील कोरोनाबाधितांचा समावेश आहे. 


मरकजशी संबंधित लोकांना पोलिस, महापालिकेचा अल्टिमेटम


तर मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मुंबईतील कोरोना संक्रमित मृतांचा आकडा ३० वर पोहोचला आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये वरळी आणि धारावी या दोन परिसरांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. वरळी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट मानला जात आहे. या परिसरातील अनेकांना क्वारंटाईनही करण्यात आले आहे. 


दरम्यान, गेल्या आठवड्याच्या तुलनेत देशात कोरोनाच्या प्रसाराचा वेग वाढला आहे. कोरोनाच्या देशातील एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे ६२ जिल्ह्यांमध्ये आढळून आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता सरकारी अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.