`कोरोनाविरुद्ध युद्ध सुरु झालंय, धोक्याचा भोंगा वाजलाय, आता सावध व्हा`
नागरिकांनी घरात राहून सरकारी यंत्रणेवरील ताण कमी करणे गरजेचे आहे.
मुंबई: कोरोना विषाणूचा सामना करणे हे एकप्रकारचे युद्ध आहे. युद्धाचा भोंगा वाजला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध होऊन सरकारने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कोरोना व्हायरसच्या राज्यातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटाची तुलना १९६५ आणि १९७१ च्या युद्धाशी केली. त्यावेळी भोंगा वाजला की लोक आपापल्या घरात जाऊन लपायचे. घरातील दिव्यांचा प्रकाशही बाहेर येऊन दिला जायचा नाही. जेणेकरून शत्रूला आपला पत्ता लागणार नाही.
कोरोनाविरुद्धची लढाई हेदेखील वेगळ्याप्रकारचे युद्ध आहे. अशावेळी नागरिकांनी घरात राहून सरकारी यंत्रणेवरील ताण कमी करणे गरजेचे आहे. रुग्णालये आणि इतर अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी आपल्यासाठी २४ तास झटत आहेत. त्यांनाही कोरोना व्हायरसची लागण होण्याची भीती आहे. मात्र, भारतीय जवानांप्रमाणे जीवावर उदार होऊन हे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे आपण त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
बस आणि ट्रेनची गर्दी कमी झाली असली तरी अजूनही काहीजणांकडून अनावश्यक प्रवास होत आहे. कोरोना विषाणू एकएक पाऊल पुढे टाकत आहे. त्यामुळे आत्ताच सावध होणे अत्यंत गरजेचे आहे. गर्दी टाळण्यासाठी कायदा करण्याची गरज येऊ नये. मात्र, या सगळ्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत. शेवटी युद्ध ही जिद्दीवरच जिंकली जातात, असे उद्धव यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे
* लोकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. युद्ध ही जिद्दीनेच लढायची आणि जिंकायची असतात.
* केंद्र सरकार या युद्धात आपल्या बरोबरीने उतरले आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य
* नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास कोरोना आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही.
* परदेशात अडकलेले भारतीय आपलेच आहेत.
* संकट जात धर्म ओळखत नाही, हे संकट सर्वांनी मिळून संपवू या.
* बाहेर निघू नका, सरकार यावर अंकुश आणू शकतं, पण तशी सरकारची आताही इच्छा नाही.
* कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याकडे पुरेशी साधनसामुग्री आहे. जीवनावश्यक गोष्टींचाही पुरेसा साठा आहे.
* एखाद्याला नकळत कोरोनाची लागण झाली असेल त्यामध्ये काहीही चूक नाही. मात्र, क्वारंटाईन स्टॅम्प मारलेले लोक इकडेतिकडे फिरतात. व्हायरसचा प्रादुर्भाव करणे ही गोष्ट चूक.