मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी ही वाढ राज्याची चिंता वाढवणारी आहे. राज्यात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे राजकारण्यांकडून मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. लोक भारतीचे अध्यक्ष, आमदार कपिल पाटील यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे. नितेश राणे यांनी राज्य सरकारवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोरोनावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जीवावर उदार होऊन लढत आहेत. उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत सह्याद्री, मंत्रालयात जातात. अधिकारी, मंत्रिमंडळच्या बैठक घेतात. झारखंड, काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनीही उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. असं असतानाही, कोरोनाच्या अशा परिस्थितीतही काहीजण वाईट पद्धतीने त्यांच्यावर, शासनावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. ही बाब अतिशय खेदजनक आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे शोभणारं नाही' अशी टीका कपिल पाटील यांनी केली आहे.



'शासनाच्या चुकांवर बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे. चुका दाखवाव्यात. परंतु अशा परिस्थितीत राज्य सरकारला मदत करता येत नसेल तर खालच्या पातळीवर टीका करु नये. टीका नंतरही करता येतील, पण आता कोरोनावर एकत्रित मात करावी' अशा शब्दात त्यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला आहे.


राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. संपूर्ण भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १०८० वर पोहचला आहे. त्यामुळे सतत वाढत जाणारी रुग्णांची संख्या महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.