मुंबई : देशात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. तर महाराष्ट्रात देखील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कालपर्यंत ४० प्रयोगशाळांच्या माध्यमातून राज्याने एक लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्यांचा आकडा पार केला आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या असून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याच्या किमान एक महिना आधीपासून या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या निदानात मोठी मदत होत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज राज्यात १ लाख ८ हजार ९७२ नमुने पाठविण्यात आले. २४ एप्रिल पर्यंत राज्यात १ लाख २ हजार १८९ नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९४ हजार ४८५ जणांची चाचणी निगेटिव्ह आले आहेत तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले.  राज्यात साधारणत: दररोज पाच ते सात हजार चाचण्यांची क्षमता असून जास्त चाचण्या होत असल्याने कोरोनाच्या रुग्णांचे तातडीने निदान होणे शक्य होत आहे.


साधारणत: २१ जानेवारीपासून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोनासाठी प्रवाशांची तपासणी केली गेली. त्यानंतर बाधीत भागातून आलेल्या प्रवाशांची आरोग्य विभागामार्फत १४ दिवसांचा पाठपुरावा करण्यात आला. ज्या प्रवाशांना सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आली त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत होते.


राज्यात सुरूवातीला पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) तपासणीची सुविधा होती. राज्यात साधारणत: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाच जणांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत साधारणपणे तीन महिन्यात राज्यातील चाचण्यांचा आकडा लाखावर गेला आहे.


शुक्रवारी राज्यात कोरोनाचे ३९४ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ६८१७ इतका झाला आहे. यापैकी ४,४४७ रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. तर पुण्यात कोरोनाचे १०२० रुग्ण आढळून आले आहेत. ४ मे रोजी देशातील लॉकडाऊन उठला तरी मुंबई आणि पुण्यातील निर्बंध १८ मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे.