मुंबई : सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुयोग्यप्रकारे ‘मास्क’ (मुखपट्टी / मुखावरण) सदोदीत परिधान करणे, हा ‘कोरोना कोविड – १९’ या संसर्गजन्‍य रोगास प्रतिबंध करण्‍याचा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे जगभरातील तज्ज्ञांद्वारे वेळोवेळी सांगितले जात आहे. याच अनुषंगाने ‘मास्क’ वापरण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने सर्वस्तरीय जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर ‘विना मास्क’ सार्वजनिक ठिकाणी वावरणा-यांवर रुपये २००/- एवढी दंड आकारणी देखील करण्यात येत आहे. ही दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश देतानाच महापालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी ही कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबई पोलिस दल, वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या अति वरिष्ठ अधिका-यांची एक विशेष बैठक 'दूरदृश्‍य प्रणाली’द्वारे आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्तांनी वरील निर्देश दिले आहेत. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, महापालिकेचे सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, महापालिका रुग्णालयाचे अधिष्ठाता, सार्वजनिक आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेच्या विविध खात्यांचे अति वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलिस दलाच्या आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त श्री. शहाजी उमप उपस्थित होते.           


या बैठकी दरम्यान चर्चिले गेलेले महत्त्वाचे मुद्दे, संबंधित निर्देश याबाबतची ठळक माहिती पुढीलप्रमाणे आहेः-


 ‘विना मास्क’ विषयक दंडात्‍मक कारवाई आता पोलिस देखील करणार


• बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या सर्व २४ विभागांच्‍या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक परिसरांमध्‍ये ‘विना मास्क’ वावरणा-या नागरिकांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी रुपये २००/- याप्रमाणे दंडात्‍मक कारवाई यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. यानुसार आजतागायत ४० हजार पेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, यापोटी रुपये १ कोटी ५ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.  


• वरीलनुसार करण्यात येत असलेली दंडात्मक कारवाई ही आता अधिक कठोरपणे राबविण्याचे निर्देश आजच्या बैठकी दरम्यान देण्यात आले. यासाठी प्रभाग स्तरीय नियोजन करण्याचे व त्यासाठी संबंधित मा. नगरसेवकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. यानुसार संबंधित संस्थांचे प्रतिनिधी व महापालिका कर्मचारी यांच्याद्वारे नियमितपणे कारवाई सुरु आहे.
‘विना मास्क’ विषयक दंडात्मक कारवाईसाठी मुंबई पोलिस दल व वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई नियमितपणे करणार.


• मुंबई पोलिस दल व वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई सुयोग्यप्रकारे व्हावी, याकरिता महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या स्तरावर ‘संयुक्त कारवाई आराखडा’ तयार करण्याचे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश.


• दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, प्रभात फेरीला (मॉर्निंग वॉक) जाणारे नागरिक इत्यादींवर देखील ‘विना मास्क’ विषयक कारवाई करण्याचे निर्देश.


• आवश्यकतेनुसार संबंधित कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश.


वैद्यकीय चाचण्‍या व्‍यापकतेने करण्‍याचे निर्देश


• बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड विषयक वैद्यकीय चाचण्‍यांची संख्‍या वाढविण्‍याची गरज लक्षात घेऊन सर्व विभागस्‍तरीय सहाय्यक आयुक्‍तांनी आपापल्‍या विभागातील दैनंदिन चाचण्‍यांची संख्‍या नियोजनपूर्वक वाढविण्‍याचे निर्देश.


• ‘कोविड’ विषयक वैद्यकीय चाचणी करताना ती ‘आरटीपीसीआर चाचणी’ व ‘रॅपिड ऍन्टीजेन चाचणी’ या दोनप्रकारे प्रामुख्याने केली जाते. या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांची संख्या नियोजनपूर्वक वाढविण्याचे निर्देश. सध्या महापालिका क्षेत्रात दोन्ही प्रकारच्या चाचण्या मिळून दररोज १४ ते १५ हजार चाचण्या केल्या जात असून ही संख्या २० हजारापर्यंत वाढविण्याचे निर्देश.