कोरोनाचा लढा : सढळ हस्ते मदत! राहुल बजाज - टाटा ट्रस्ट, अक्षयकडून कोट्यवधींची मदत
देश आणि राज्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेकांचा हातभार लागत आहे.
मुंबई : देश आणि राज्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेकांचा हातभार लागत आहे. उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही मदत केली आहे. तसेच राजकीय लोकप्रतिनिधींकडूनही मदत होत आहे. आमदार आणि खासदारांनीही मदत केली आहे. तसेच राज्यातील उद्योगपतींनीही हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यात मोठी मदत होणार आहे. करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
टाटा ट्रस्टने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५०० कोटी रुपये देऊ केले आहेत. यापूर्वी बजाज ग्रुपने १०० कोटी रुपयांची मदत करोनाशी लढण्यासाठी सरकारला देऊ केली होती. देशासमोर उभ्या असलेल्या करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारला मदत म्हणून वाहनउद्योग श्रेत्रातील बजाज समुहाने १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीचा वापर देशात आरोग्यसेवा पुरवाणाऱ्या यंत्रणांचे सबलिकरण करण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी होणार आहे.
दरम्यान, राहुल बजात यांच्याकडून जाहीर झालेल्या मदतीनंतर बजाज यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं कौतुक केले आहे. त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ९०० च्या जवळ जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे १६७ रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. जनतेने येत्या काही दिवसात घराबाहेर पडू नये, असं आवाहन सगळेच करत आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदारांनी मदत जाहीर केली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच त्यांच्या मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांनी ५० लाख अशी एक कोटींची मदत जाहीर केली आहे. कोरोनाविरोधातील लढाईत शिंदे पिता - पुत्र यांची आमदार - खासदार फंडातून तब्बल एक कोटींची मदत दिली आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांस पत्र लिहून ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार निधीतून ५० लाख रुपये खर्च करण्यास मान्यता दिली. तर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपल्या खासदार निधीतून ५० लाख दिले आहेत.
राज्यातील ग्रामसेवकांनीही आपला एक दिवसाचा पगार देण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने एका तासाच्या आत प्रतिसाद दिला. कोरोनाचा हा वाढता धोका लक्षात घेता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार मदतीला धावला आहे. अक्षय कुमारने प्रधानमंत्री सहायता निधीला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे.
कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-१९ हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.